Thursday, July 28, 2011


शिरवळ गावाच्या पश्चिमेला एका ओढयाच्या काठावर श्रीकेदारेश्वराचे भव्य आणि सुंदर मंदिर आहे.हे मंदिर अत्यंत प्रशस्त आणि उत्तम घडीव दगडी फरसबंदीचा प्राकार असलेले आहे.सभोवती चारी बाजूंनी मजबूत दगडी तट आहेत.तटाची उंची सुमारे १८ फूट आहे.

मंदिर पूर्वाभिमुख असून महाद्वाराचे बांधकाम रेखीव,सुबक आणि मजबूत आहे.प्रवेशद्वाराची कमान सात पाकळयांची,उभट व उंच आहे.देवळात प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला देवड्या आहेत. देवड्या ओलांडताच प्राकार सुरू होतो.या देवड्यांवरच पूर्वी नगारखाना वाजवत.या नगारखान्याच्या खाली आणि प्रवेशद्वाराच्या व देवडीच्यावर देवासमोर एक श्रीगजाननाचे शिल्प आहे.त्याच्या दोन्ही बाजूंना ऋद्धि-सिद्धि असून ते भग्नावस्थेत आहेत.प्राकारात सुरुवातीला देवाकडे तोंड करून एका चौथर्‍यावर बांधलेल्या मंदिरात नंदी बसलेला आहे.याला नंदिकेश्वर म्हणतात.देवाकडे लक्ष लावून बसलेल्या गंभीर नंदिकेश्वराचे लक्ष गाभार्‍यातील केदारेश्वराच्या शाळुखेवर आहे.नंदीच्या उजव्या हाताला दक्षिण कोपर्‍यात सुबक,अष्टकोनी व प्रमाणबद्ध घडीव दगडांची दीपमाळ आहे.दीपमाळेसमोर प्राकारात गणपती आणि विठ्ठलाची दोन छोटी देवळे आहेत.

समोरच्या उंच चौथर्‍यावर श्रीकेदारेश्वराचे मुख्य मंदिर आहे.पहिला सभामंडप १६ दगडी खांबांवर उभारलेला आहे.या सभामंडपातून एका प्रवेशद्वाराने आपण मधल्या गाभार्‍यात प्रवेश करतो.हा गाभारा ५-५ खांबांच्या ओळीवर उभा आहे.खाली दगडी फरसबंदी आहे.भिंतीत दोन ठिकाणी मशाली व दिवट्या ठेवण्यासाठी दिवळ्या आहेत.देवाच्या गाभार्‍याचे प्रवेशद्वार येथेच आहे.डोक्यावर गणेशपट्टी आहे.देवाचा गाभारा खाली खोल आहे.श्रीमुख पूर्वेला आणि सोमसूत्र उत्तरेला आहे.

प्राकार विस्तीर्ण आहे.महाद्वारापासून ते पश्चिमेकडील तटापर्यंत सुमारे ३५० फूट लांब आणि दक्षिणोत्तर रुंदी सुमारे १५० फूट आहे.देवळाच्या शिखराची उंची सुमारे ५० फूट आहे.शिखरावर नाना प्रकारच्या देवदेवतांच्या मूर्त्या असून त्या आजही सुस्थितीत आहेत.या मंदिराच्या बांधकामावर इस्लामी शिल्पकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.

या मंदिराबाबतची आख्यायिका अशी की, विजयनगरच्या राजांनी या मंदिराची उभारणी केली.एका शेतकर्‍यास शेत नांगरताना नांगराच्या फळाला शंकराची पिंड लागली.त्या शेतकर्‍याने राजाच्या कानावर ही गोष्ट घातली.राजाने त्या लिंगास शोभेल असे ‘सोमसूत्र’ तयार करून मंदिर उभारण्याचे ठरवले.सुंदर घडीव दगडांच्या या मंदिराचे बांधकाम सुमारे २० वर्षे चालले.

निगडे-देशमुखांचे केदारेश्वर हे कुलदैवत.त्यांच्याकडेच दररोजच्या दिवाबत्ती व दरसाल महाशिवरात्रीस देवाच्या उत्सवाची जबाबदारी होती.ग्रामस्थांच्या सहयोगाने आज या मंदिराची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली जाते.